साग लागवड दोन पद्धतीने करता येते - १) सागजडी लावून, २) पिशवीतील रोपांची लागवड करून. सागजडी लावून लागवड करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्यतो लगेच लागवड करावी. जडी तयार केल्यापासून आठ ते दहा दिवसांतच लावावी. सागाची जडी लावताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीत जोवर वाफसा आहे, तोवरच लागवड करावी.
लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात पहारीने जडीच्या उंचीची छिद्रे करावीत. खोडाचा भाग जमिनीच्या वर ठेवून मुळांचा भाग जमिनीत लावावा. नंतर आजूबाजूची माती पक्की दाबावी. सागजडीच्या तळाशी आणि आजूबाजूस पोकळी राहून पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
भारतीय सागाची लागवड केल्यास तो कापणीयोग्य होण्यासाठी २५ ते ३० वर्षे लागतात. ऍ केशिया मॅंजियम १२ ते १५ वर्षांमध्ये तयार होतो, त्यामुळे या जातीची लागवड अधिक फ ायदेशीर ठरते. या दोन्ही जातींच्या झाडांच्या लाकडाचा दर्जा चांगला असतो.
पिशवी रोपांची लागवड करण्यापूर्वी खड्डा भरताना पोयट्याची माती, एक ते दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत व पाण्याचा निचरा होण्यात अडथळा असेल तर काही प्रमाणात वाळू घालून खड्डा भरावा.
सागातील दोन रोपांमध्ये, त्याचप्रमाणे दोन ओळींमध्ये किती अंतर असावे हे प्रजाती, जमिनीचा प्रकार, विरळणीचा प्रकार, आंतरपिके या गोष्टी लक्षात घेऊन ठरवावे. जास्त अंतरावर साग लागवड केली, तर त्यामध्ये अन्नधान्यांची पिके घेता येणे शक्य होते. सागामध्ये आंतरपिके घेताना जमिनीचा मगदूर, रोपांमधील अंतर, पाण्याची व्यवस्था, ऋतुजैविकी इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात. सागाच्या झाडांमध्ये सोयाबीन, मालदांडी ज्वारी, बाजरी यांचे आंतरपीक घेता येते, कारण ही पिके कमी कालावधीत तयार होतात, तसेच भाजीपाला पिकांमध्ये वांगी व मिरचीची लागवड करता येऊ शकते. अधिक माहिती तज्ज्ञांकडून मिळू शकेल.
- ०७१२ - २५२१२७६
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर
बांधावर लागवड करताना
सागाच्या जड्या धुऱ्यावर लावण्यासाठी खड्डा करण्याची आवश्यकता नाही. पहारीच्या साह्याने बांधाच्या आतील कडेवर सहा इंच खोल छिद्र करावे व त्यात कीडनाशक पावडर टाकून सागाची जडी लावावी. बांधावर लागवड करताना एक हेक्टर क्षेत्रावर साधारण ३०० झाडे लावता येतात. लावताना बांधावर पूर्व-पश्चिम समांतर रेषेत लावावेत, त्यामुळे शेतातील पिकावर सावली कमी पडते.
बांधावरील साग झाडांच्या वाढीचा वेग चार पटीने जास्त असतो. कारण आंतरपिकांसोबत लावल्याने अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळतात. झाडांना पाण्याचा ओलावा मिळतो. खते व पाणी उपलब्ध होते. एका ओळीत असल्याने झाडांत स्पर्धा कमी असते. वाढ जोमाने होते.