Tuesday, 20 December 2016

दृष्टिक्षेपात तळगाव


रामेश्वराच्या कृपाछत्राखाली नांदणारे तळगाव....!!!
मालवण-कणकवली महामार्गापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर गर्द हिरवाईने नटलेले गाव म्हणजे तळगाव. श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी सातेरी यांच्या कृपाछत्राखाली नांदणारे तसेच खळखळणा-या कर्लीनदीच्या किनारी वसलेले गाव म्हणून तळगावची ओळख आहे. जाणकारांच्या सांगण्यानुसार तळगावात शिवकालीन सैन्यांनी तळ ठोकल्याने गावाला तळगाव हे नाव पडले. बारमाही शेती-बागायतीमुळे तळगाव हिरवाईने नटलेले दिसून येते. कट्टा - पाण्याच्या दृष्टीने तळगाव समृद्ध असून गावात भोवर, सुकेतळे व झरयाळा हे तीन तलाव प्रसिद्ध आहेत. तसेच गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोरच गावाची स्मशानभूमी आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात अशा प्रकारचे हे एकमेव देवस्थान आहे. शांतताप्रिय व ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तळगाव विकासाच्या वाटेवर घौडदौड करत आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत विविध योजना गावात राबवल्या गेल्यामुळे येथील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
स्वातंत्र्यकाळापूर्वी ताळगावात ग्रामपंचायतीची स्थापना झाली. पूर्वी येथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जात असे. परंतु, आधुनिकतेनुसार कलानुरूप हळूहळू सर्व गोष्टीत बदल होत गेला. गावात पक्के रस्ते, वाडीवाडीत जाणा-या सुसज्ज पायवाटा, आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक उपकेंद्र, शाळा यासोबत अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या. हळूहळू तळगाव विकासाचे टप्पे पार करत गेले. पूर्वीपासूनच शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे.गावातील शेतकरी, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शेती-बागायतीचे मळे फुलवलेले दिसतात. भात, कुळीथ, उडीद, नाचणी, भुईमूग, मका, चवळी, कलिंगड, सूर्यफूल इत्यादी उत्पादन शेतकरी घेत असल्याने अर्थाजनाचा मार्ग सुलभ झाला आहे. शेती बागायतीबरोबरच पशुपालन व दुग्धोत्पादन हा व्यवसायदेखील तळगावात तेजीत आहे. तळगावात १९९२ साली श्री रामेश्वर दुग्ध व्यवसाय दूध डेअरीची स्थापना करण्यात आली. या दूध डेअरीच्या चेअरमनपदी रामचंद्र दळवी व सेक्रेटरी हनुमंत दळवी कार्यरत आहेत. महिन्याभरातून सुमारे २५० ते ३०० लिटर दूध गावातील दूध डेअरीमधून निर्यात केले जाते. प्रामुख्याने शेती या प्रमुख व्यवसायामुळे तळगावात ख-या अर्थाने आर्थिक सुबत्ता आली आहे. गावची लोकसंख्या २,१०५ इतकी असून त्यापैकी १,१५० स्त्री तर ९५५ पुरुष संख्या आहे. यावरून तळगाव स्त्रीप्रधान असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच विद्यमान सरपंच शारदा पेडणेकर यांच्या रूपाने गावाला महिला सरपंच लाभल्या आहेत. तर त्यांच्यासोबत कार्यभार सांभाळण्यासाठी उपसरपंचपदी वनीता दळवी या कार्यभार सांभाळत आहेत.
श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी सातेरी हे गावातील प्रमुख देवस्थाने असून श्री दत्त मंदिर, श्री ब्राह्मणदेव, श्रीदेव गावडोबा, श्री देवी भवानी, श्री भोवर देव ही देवस्थाने प्रसिद्ध आहेत. तसेच बारापाचाच्या देवतांमध्ये हेमगिरी मठ, खांददारवळय़ा या ठिकाणी आहेत. तळगाव, खांद, पेडवे, म्हावळुंगे ही ४ गावे महसुली गावांमध्ये येतात. गावात एकूण १३ वाडय़ा असून यामध्ये देऊळवाडी, बौद्धवाडी, दारवळवाडी, खांदवाडी, पेडवेवाडी, काटापूरवाडी, देवारेवाडी, राणेवाडी, ब्राह्मणवाडी, शेळवणेवाडी, म्हावळुंगेवाडी, गावडेवाडी, रायवाडी, सुकळवाडी या वाडय़ांचा समावेश आहे. गावातील ग्रामस्थांमधील एकजूट व लोकप्रतिनिधींचे सहकार्य यामुळे २००० साली निर्मलग्राम पुरस्कार, २०१०-११ ते २०१२-१३ सलग तीन वष्रे पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच गावातील राणेवाडी या प्राथमिक शाळेला शैक्षणिक गुणवत्ता या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
तळगावातील अनेक मान्यवरांनी आमदार, मुंबईचे महापौर अशी पदे भूषवली आहेत. गावचे सुपुत्र संजय दळवी हे जिल्ह्यातील एक नामवंत भजनी कलाकार असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते भजन स्पर्धामध्ये परीक्षक म्हणून काम पाहतात. तळगावचे हित साधण्यासाठी गावातील प्रमुख व्यक्ती व ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन १९३५ साली तळगाव हितवर्धक संस्था स्थापन केली. त्याच माध्यमातून १९८३ साली श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगावची स्थापना करण्यात आली. या प्रशालेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गावात एकूण सहा प्राथमिक शाळा, सहा अंगणवाडय़ा, तळगाव विविध कार्यकारी सोसायटी संस्था, प्राथमिक उपकेंद्र कार्यरत आहेत. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी तळगाव गावचे पोस्ट ऑफिस आहे. तळगावात एकूण ३९ सार्वजनिक विहिरी असून नळपाणी योजना कार्यन्वित आहेत. लाभार्थी कुटुंब संस्था ५६२ असून सुमारे ६० कुटुंबांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे. तळगावात प्रामुख्याने श्रीदेव रामेश्वर जत्रोत्सव, शिमगोत्सव, महाशिवरात्र हे वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्याचबरोबर गावात दलीत वस्तीत सुसज्ज समाजमंदिर असून त्या ठिकाणी नवरात्रोत्सव, आंबेडकर जयंती, बौद्ध जयंती व इतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. गावात एकूण २० बचतगट कार्यरत आहेत. गावातील ग्रामस्थांचा संघटितपणा तसेच श्री देव रामेश्वराचा कृपाशीर्वाद व गावाचा कोकण रेल्वेसाठी असलेला खारीचा वाटा या गोष्टींमुळे आज तळगावात आर्थिक समृद्धी
नांदत आहे.
दृष्टिक्षेपात तळगाव..
ग्रा. पं. स्थापना : १९४१
वाडय़ा : १३
क्षेत्रफळ : ८८६ हेक्टर ३४ आर
पुरस्कार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम
पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार

No comments:

Post a Comment