Friday, 5 January 2018

उसावरील कीड नियंत्रणासाढी करा उपाययोजना​

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उसावरील कीड नियंत्रणासाढी करा उपाययोजना

राज्यामध्ये ऊस पिकावर या काळात प्रादुर्भाव करणाऱ्या पायरीला, पांढरी माशी, लोकरी मावा, पिठ्या ढेकूण, खवले कीड व मूळ कुरडणारी कांडी कीड आणि हुमणी या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

मूळ कुरतडणारी अळी
(बुडखा कांडीकीड)

    शेंड्याची पाने वाळलेली दिसतात, तर इतर पाने पिवळी होतात. वाळलेला ऊस ओढल्यानंतर तो बुडख्यातून मोडून निघतो.
    जमिनीलगतच्या खोडात पांढरट रंगाची अळी दिसून येते.
    प्रादुर्भाव लागणीपेक्षा खोडवा पिकात मोठ्या प्रमाणात येतो.

नियंत्रण :

    वाळलेला पोंगा ओढून तारेने आतील अळी मारावी.

    प्रादुर्भावीत फुटवे दर आठवड्याला खूडून नष्ट करावेत.

    प्रकाश सापळ्यांचा वापर प्रौढ कीटक नष्ट करण्यासाठी करावा. प्रादुर्भावीत उसाची तोडणी जमिनीलगत खोलवर करावी.

    प्रादुर्भावित ऊस तोडणीनंतर उरलेले अवशेष लगेच खोदून नष्ट करावेत.

    फुले ट्रायकोकार्ड ५ ते ७ प्रति हेक्टरी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने वापरावेत.

    फिप्रोनिल (०.३ जी.आर.) २५ किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे.

लोकरी मावा

    पिल्ले व प्रौढ पानाखाली स्थिर राहून अणुकुचीदार सोंडेने पानातील अन्नरस शोषतात. पानाच्या कडा सुकतात. पाने वाळू लागतात. त्यांच्या विष्ठेद्वारे सोडलेल्या मधासारख्या चिकट पदार्थांवर काळ्या रंगाच्या कॅप्नोडियम या बुरशीची वाढ होते. पान संपूर्ण काळे पडल्याने पानाची कर्बग्रहणाची प्रक्रिया मंदावते. अधिक प्रादुर्भावामध्ये, पानाची लांबी व रुंदी कमी होऊन उसाची वाढ झपाट्याने खुंटते.
    ऊस उत्पादनात साधारणतः ११-२० टक्के, तर साखर उताऱ्यात ०.५-२.० युनिटने घट होते.

कीड व्यवस्थापन

    कीडग्रस्त बेणे वापरू नये.
    लागवडीपूर्वी मॅलेथिऑन (५० टक्के प्रवाही) ३०० मिली किंवा अथवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २६५ मिलिलिटर प्रति १०० लिटर पाणी या द्रावणात बेणे १५-२० मिनिटे बुडवून प्रक्रिया करावी.
    उसाची पट्टा अथवा रुंदी सरी पद्धतीने लागण करावी.
    शेताच्या चोहोबाजूंनी दोन ओळी मका व दोन ओळी चवळी लावावी.
    ऊस पिकास गरजेप्रमाणे आवश्‍यक तेवढेच पाणी व नत्र खत द्यावे.
    डिफा ऑफिडीव्होरा, मायक्रोमस, सिरफीड माशी, लेडी बर्ड बीटल व क्रायसोपा या परभक्षी मित्रकीटकांच्या अळ्या उसावरील लोकरी मावा खातात. त्यासाठी डिफा ॲफिडीव्होरा हे परभक्षी मित्र किटक १००० अळ्या किंवा कोष अथवा मायक्रोमस २५०० अळ्या प्रति हेक्टरी सोडाव्यात. इनकार्सिया फ्लेव्होस्कुटेलम हा परोपजीवी किटक जुलै ते डिसेंबर या कालावधीत आढळून येतो. या परोपजीवी किटकामुळे लोकरी माव्याच्या पृष्ठभागावर लहान बारीक काळे छिद्र दिसते. असे काळे छिद्र असल्यास लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी काहीच करावयाची आवश्‍यकता नाही.
पाकोळी (पायरीला)

    पाठीमागे चिमट्यासारख्या दोन शेपट्या असणारी पिल्ले तसेच तपकिरी रंगाच्या प्रौढावस्था पानावर दिसतात.

    या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. अधिक प्रादुर्भावात पानावर काळी बुरशी वाढते. उसाच्या वजनात व साखर उताऱ्यात घट येते.

नियंत्रण

    झपिरीनिया मेल्यॅनोल्युका या मित्र किटकाचे ५ हजार कोष अथवा ५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी सोडावीत.

    ऑगस्ट महिन्यानंतर उसाची खालची पाने काढावीत.

    पाकोळीची अंडी गोळा करून त्यांचा नाश करावा.

पिठ्या ढेकूण

कांडीवर पाचटाखाली लांबट गोल आकाराची, लालसर रंगाची व अंगावर मेणचट आवरण असलेली पिठ्या ढेकणाची पिल्ले दिसतात. यामुळे उसाची वाढ मंदावते  व ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट येते.

खवले कीड

खोडवा पिकात खवले किडीचा प्रादुर्भाव लागणीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतो. राखाडी तपकिरी गोल आकाराचे थर उसाच्या कांड्यावर दिसून येतात. हलकी जमीन, पाण्याच्या पाळ्यातील अधिक अंतर व व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रादुर्भाव वाढतो.

खवले कीड व पिठ्या ढेकूण नियंत्रण

    ​निरोगी बेण्याची निवड करावी.

    ​बेणे प्रक्रिया​ - डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २६५ मिली किंवा मॅलेथिऑन (५० टक्के प्रवाही) ३०० मिली प्रति १०० लिटर पाणी या द्रावणात १५ ते २० मिनिटे बेणे बुडवावे.
    प्रादुर्भावग्रस्त उसाची वाळलेली पाने वेळोवेळी काढावीत.
    शिफारशीपेक्षा अधिक नत्र वापरू नये.
    प्रादुर्भावग्रस्त शेतात ऊस तोडणीनंतर सर्व अवशेष जाळून नष्ट करावेत.
    अधिक प्रादुर्भाव असलेल्या शेतामध्ये उसाचे खालील वाळलेले पाचट काढावे, वरील ८-९ हिरवी पाने ठेवावीत. तसेच अशा शेतात खोडवा घेणे टाळावे.

पांढरी माशी

    दलदलीच्या ठराविक ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
    पानाच्या खालच्या बाजूस गोल, नाजूक, पांढरट पिले व कोष दिसतात.
    ही कीड पानातील रस शोषून घेत असल्याने ऊस उत्पादनात व साखर उताऱ्यात घट येते.

नियंत्रण:

    पिकामध्ये पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा. मात्र, पाण्याचा ताण पडू देऊ नये.
    लागवड व खोडव्यास रासायनिक खतांची मात्रा शिफारशीनुसार व योग्य वेळी विभागून द्यावी.
    खोलगट जमिनीत व नदीशेजारील भागात खोडवा ठेवायचे टाळावे.
    खोडवा पिकांची वेळेत तोडणी करावी.
    व्हर्टिसिलीअम लेकॅनी (फुले बगीसाईड) १ किलो अधिक १ लिटर दूध प्रति २०० लिटर पाणी हे द्रावण रात्रभर भिजत ठेवून, त्याची फवारणी करावी. पुढील फवारणी १०-१५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

हुमणी
    पानाची शीर व पाने पिवळी होतात. ऊस उपटला असता सहजासहजी उपसून येतो. मुळे खाल्लेली दिसून येतात.
    उपटलेल्या उसामध्ये हुमणीच्या ‘सी’ आकाराच्या पिवळसर रंगाच्या अळ्या दिसून येतात.
    दुर्लक्षित पिकामध्ये ८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते.

नियंत्रण​ :
हुमणीच्या अळ्या आणि कोष नैसर्गिक शत्रूंना बळी पडण्यासाठी दोन नांगरणी जास्त कराव्यात. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा ठेवू नये.

जैविक उपाय​ : जमिनीत मेटारायझीम ॲनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना २५ किलो शेणखतातून किंवा शेणकाला करून जमिनीत प्रति हेक्टरी मिसळावे.

रासायनिक उपाय​ : इमिडाक्लोप्रिड अधिक फिप्रोनिल (४० टक्के + ४० टक्के) पाण्यात विरघळणारे दाणेदार कीटकनाशक ४४० ते ५५० ग्रॅम प्रति हेक्टरी १००० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

☎ ​डॉ. एम.पी. बडगुजर, ९४२२७७११२६
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,
पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🍁  🍁
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment