🌳 *कृषिसमर्पण* 🌳
🍇 *द्राक्ष बाग उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा* 🍇
- पुणे व जुन्नर भागामध्ये ते सर्वात थंड राहील. येथे एक दोन दिवस रात्रीचे तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत कमी राहून, पुढे काही दिवस १२ ते १३ अंशापर्यंत थोडे वाढण्याची शक्यता आहे.
- नाशिकमधील सध्याची थंडी कमी होऊन रात्रीचे तापमान १३ ते१४ अंशांपर्यंत वाढू शकेल.
- नाशिकचा उत्तर भाग, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागामध्ये शुक्रवार व शनिवार (ता. २९ व ३०) काही काळ वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी रात्रीचे तापमान आणखी वाढू शकेल.
- सोलापूर भागामध्ये १६ ते १७ पर्यंत वाढू शकेल.
- सांगली भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थंडीचा चढउतार होऊन तापमान ११ ते १४ अंशापर्यंत राहू शकेल.
🍇 *भुरीबाबत सतर्कता आवश्यक* 🍇
सध्याच्या परिस्थितीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची शक्यता कमी दिसते. तरीसुद्धा भुरीच्या नियंत्रणाबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरणामध्ये भुरी वेगाने वाढते. ढगाळ वातावरण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रणाचा वापर अधूनमधून करावा. शक्य तो आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर कमी करावा. त्याऐवजी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा जैविक नियंत्रक घटकांची (उदा. अॅम्पिलोमायसीस किंवा ट्रायकोडर्मा ५ मि.लि प्रति लिटर या प्रमाणात) फवारणी करावी. सल्फरची फवारणी व जैविक नियंत्रण घटकांची फवारणी पाच दिवसाच्या अंतराने घेतल्यास सध्याच्या वातावरणात भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल.
🍇 *मणी सुकणे व अन्य समस्या* 🍇
- बऱ्याच ठिकाणी बागेमध्ये घडावरील मणी वाढण्याच्या अवस्थेत मणी सुकणे किंवा उकड्यासारखे प्रकार दिसून येत आहेत. आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची लक्षणे कुठल्याही बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत नाहीत. बागेमध्ये रात्रीचे तापमान फार कमी झाल्यास, त्याचा परिणाम मण्यांवर होतो.
- मणी वाढत असताना मण्यावर वेगवेगळ्या संजीवकांचा वापर केला जातो. संजीवकाच्या वापरानंतर मण्याच्या अंतर्गत होणारे बदल वेगाने होत असतात. त्यामुळे मणी कमी अथवा जास्त तापमानाला अधिक संवेदनशील असतात. रात्री सध्या कमी होणाऱ्या तापमानामुळे व सकाळी येणाऱ्या सूर्यकिरणामुळे मण्याना दुखापत होते व मणी खराब होतात.
- बागेतील तापमान रात्रीच्या वेळी किती अंशापर्यंत कमी होऊ शकते, याची कल्पना सर्वसाधारणपणे येत नसते. परंतु, ज्या बागा तलाव, नदी किंवा पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी किंवा खोलगट भागामध्ये असतात, अशा ठिकाणी रात्रीचे तापमान अपेक्षेपेक्षा खूपच कमी होते. खोलगट भागात खेळती हवा नसल्यामुळे तापमान कमी राहते. तेथील घडांमध्ये जास्त दुखापत होऊन मणी खराब होतात.
- ज्या बागांमध्ये दरवर्षी अशा प्रकारे घडांचे नुकसान होत असल्यास बागेच्या बाहेर जवळपास रात्रीच्या वेळी शेकोटी लावाव्यात. बागेतील तापमान उबदार राहून बागेमध्ये घडांचे नुकसान टाळणे शक्य होते. ज्या ज्या भागांमध्ये थंडीची लाट आल्यासारखे वाटते, तिथे थंड रात्री शेकोटी लावल्यास निश्चितच मण्यांचे नुकसान टाळणे शक्य होईल.
- बागेमध्ये सिलिसिलिक अॅसिड असणारे फॉर्म्युलेशन फवारल्यास घडाची जास्त थंडी किंवा उष्ण हवा सहन करण्याची शक्ती वाढते. अशा फवारणीवर संपूर्णपणे विसंबून राहणे शक्य नसले तरीही मणी बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहण्यास मदत होईल. रात्रीचे तापमान फार कमी व दुपारचे तापमान फार उष्ण होत असल्यास त्याचा फायदा होऊ शकेल.
📚 *स्ञोत-* ॲग्रोवन
_*|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||*_
_*शेतकरी असाल तर शेअर कराल
No comments:
Post a Comment